नवी दिल्ली : निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावर शिंदे-ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 17 जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाचे दावे फेटाळून लावले होते. यावेळी 23 जानेवारीला दोन्ही गटांना लेखी स्वरुपात उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला होते. यानंतर आज निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत धनुष्यबाण व शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे. यामुळे शिंदे गटात मोठा उत्साह निर्माण झाला आहे. तर, पहिल्यांदाच शिवसेना हे नाव ठाकरेंशिवाय असणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आजच सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी झाली. यावेळी आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. यानंतर ही सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे 21 फेब्रुवारीला पुन्हा होणार आहे. 21 फेब्रुवारीला इतर मुद्द्यावर कोर्टात युक्तीवाद केला जाणार आहे. परंतु, निवडणुक आयोगाच्या निर्णायाचा परिणाम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.