नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? यावरची केंद्रीय निवडणूक आयोगातील आजची सुनावणी संपली आहे. आता निवडणूक आयोगात पुढची सुनावणी बुधवारी होणार आहे. यावेळी शरद पवार गटाने जोरदार युक्तीवाद केला. बुधवारी शरद पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण होणार आहे. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात गुरुवारी अजित पवार गट पुन्हा युक्तिवाद करणार आहेत. या सुनावणीकडे राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
शरद पवार गटाच्या वतीने देवदत्त कामत आणि अभिषेक मनुसिंघवी यांनी बाजू मांडली. शरद पवारांच्या अध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही. शरद पवार हेच निर्विवाद अध्यक्ष असल्याचा युक्तीवाद देवदत्त कामत यांनी केला. 20 वर्षात शरद पवारांच्या नेतृत्वावर कोणी शंका घेतली नाही. याआधी अजित पवार गटानं पवारांचं समर्थन केलं. शरद पवारांमुळेच राष्ट्रवादी पक्ष मोठा झाला, असा हल्लाबोल अभिषेक मनुसिंघवींनी अजित पवार गटावर केला आहे.
दरम्यान, शिवसेना अपात्र आमदारांबरोबर राष्ट्रवादी अपात्र आमदारांची सुनावणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दोन्ही बाजूंकडून विधानसभा अध्यक्षांना उत्तर सादर करण्यात आली आहे. अजित दादा गटाकडून ४० तर जयंत पाटील गटाकडून ९ जणांचं उत्तर सादर केले गेले आहे. दोन्ही गटाच्या उत्तरानंतर अध्यक्षांसमोर पुढच्या आठवड्यात सुनावणीची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.