राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. दोन्ही गटाकडून शिवसेना आपलीच असा दावा करण्यात आला. यावरच आता शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा याबाबतची केंद्रीय निवडणूक आयोगात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. मात्र, आता निवडणुक आयोगाने पुन्हा एकदा सुनावणी पुढी ढकलली आहे. निवडणुक आयोगाने आता पुढील सुनावणीची तारीख शुक्रवारी 20 जानेवारी रोजी होणार आहे. आता दोन्ही बाजूंची सुनावणी झाल्यानंतर आता पुढील सुनावणी महत्वाची ठरणार आहे.
काय होता ठाकरे गटाचा युक्तीवाद?
निवडून आलेले आमदार हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि पक्ष वेगवेगळा. कागदपत्रे खरी ठरी असतील तर ओळख परेड करा. तातडीने निर्णय देऊ नका, कोर्टाच्या निकालाची प्रतिक्षा करा. पक्षात होता तेव्हा पक्षाच्या घटनेवर आक्षेप का घेतला नाही? पक्षाचा लाभ घेतला आणि परत लोकशाही नाही म्हणता.आमदारांनी स्वतः पक्ष सोडला आहे त्या घटनेचा पक्षावर काहीही परिणाम होणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत आपण कुठलाही निर्णय घेऊ नये. अशी मागणी देखील सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे यावेळी केली आहे. सोबतच शिंदे गटावर गंभीर आरोप लावत एकनाथ शिंदे गटाने जी प्रतिज्ञापत्रं दाखल केली आहेत ती बोगस आहेत असाही दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे. शिवसेनेत फूट पडलेलीच नाही. जी फूट पडल्याचे भासवले जाते आहे कपोलकल्पित आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने जे दावे मागच्यावेळी केले होते ते आज सिब्बल यांनी खोडून काढले. तसंच मूळ शिवसेना आम्हीच आहोत आणि शिवसेनेत जी काही फूट पडल्याचं बोलले जातं आहे त्याचा पक्षावर काहीही परिणाम झालेला नाही. ही फूट मुळीच ग्राह्य धरू नये. असे युक्तिवादात म्हणाले.
काय होता शिंदे गटाचा युक्तीवाद?
आमच्याकडे आमदार आणि खासदार यांचं संख्याबळ आहे त्यामुळे आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं होतं. आता निवडणूक आयोगात काय काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.