मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्याचे संपुर्ण राजकारण ढवळून निघाले होते. यानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला असून शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. व एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषित करत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच धक्का दिला. यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. परंतु, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार हे आधीपासूनच ठरले असल्याचा खुलासा खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज रत्नागिरी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. ते म्हणाले की, उदय सामंत यांनी भाषणात गुवाहटीचे सांगितले. मी गुवाहटीला असतानाही अनेक निर्णय घेतले. कारण मला माहित होते इथे येऊन मी मुख्यमंत्री होणार आहे. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की जिद्द आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे.
मोठमोठी संकटे आपण आरपार लढून जिंकू शकतो. पण, सर्वांनाच त्यावेळेस काय होणार याची चिंता होती. परंतु, आत्मविश्वास ज्याचा प्रबळ असतो. त्याचा विजय पक्का असतो. यामुळे नेहमीच अभ्यास चांगला करा. पण, त्याचबरोबर आत्मविश्वास देखील महत्वाचा आहे. हे मला करायचंय म्हणजे करायचंच आहे ही भावना मनामध्ये ठेवा. तुम्हाला कोणीही हारवू शकणार नाही. आणि म्हणून हे सर्वसामन्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि सर्व घटकांचे सरकार आहे. या सरकारमधून जेवढे चांगले करता येईल तेवढे काम आमचे सरकार करणार आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
मागील 4-5 महिन्यांमध्ये अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले आहेत. जे निर्णय घेण्याचे कुणी धाडस करत नव्हते. ते सर्व निर्णय घेतले. तुम्हाला राजकारणाचा संबंध नसला तरी तुम्हाला सर्व राजकारण बरोबर कळत आहे. तुम्हाला माहितीये की कोण राज्यकर्ते चांगले आहेत आणि कोण नाही, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना टोला लगावला आहे.