मुंबई : ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांचे आभार मानले आहेत.
एकनाथ शिंदे म्हणाले की, उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकार तसेच केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे मनापासून आभार. साखर उत्पादन आणि ऊसापासून तयार होणाऱ्या अन्य उपउत्पादनांच्या निर्मितीमध्ये समतोल राखण्यासाठी केंद्राने काही दिवसांपूर्वी निर्बंध आणले होते.
त्यावर राज्यातील ऊस उपलब्धता व साखर उत्पादन याबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी वस्तुस्थिती समजून घेत तात्काळ प्रतिसाद दिला. यामुळे साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वय आणि सुसंवादामुळे शेतकरी हिताचा निर्णय घेण्यात कुठलीच अडचण येत नाही. आपण सर्वांनीच स्वागत केले पाहिजे तसेच केंद्र सरकार आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आभार मानले पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर झाल्याने साखरेच्या किंमतीत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला शेतकरी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध करण्यात आला. अखेर वाढता विरोध पाहता सरकारने पुन्हा इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे.