मुंबई : नंदनवन येथे अनेकजण मला भेटायला येत आहेत. त्यांना भेटतो, नाहीतर बोलतील मुख्यमंत्री झाला तर हवेत गेला, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी करताच सभागृहात हशा पिकला. कुर्ल्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी गुवाहटीत असताना मनातील भावनाविषयी सांगितले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवस कसे गेले कळाले नाही. गुवाहटीमध्ये होते तेव्हा म्हणत होते की पळवून नेले. काहीजण संपर्कात आहेत, त्यांना म्हटलं कोण आहेत त्यांची नावं सांगा, विमानाने पाठवून देतो. मुंबईत येऊन मतदान देखील केलं तरी म्हणताहेत पळवून नेलं. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गोव्याला गेलो. तिथे देखील आनंद व्यक्त केला. तेव्हा देखील टीका करण्यात आली. व्यक्तीला आनंद झाला तर नाचतो, जास्तच आनंद झाला तर टेबलवर नाचतो. तरीदेखील टीका केली, असे त्यांनी बोलून दाखवले.
शिंदे गटाला धोका अशा बातम्या येत होत्या. मग, मला विचारायचं आता काय होईल. यावर मी त्यांना सांगायचो काही काळजी करू नका. त्यानंतर 50 आमदार झाले, मग म्हटलं आता चिंता करू नका. अजून पण येणार होते, आता म्हटलं मुंबईत जाऊन पुढचं. सध्या थांबवलं आहे. नंदनवन येथे अनेकजण भेटायला येत आहेत. त्यांना भेटतो, नाहीतर बोलतील मुख्यमंत्री झाला तर हवेत गेला, असे म्हणाताच सभागृहात हशा पिकला.
मी सर्वाना भेटतो. बालाजी कल्याणकरला विचारा, त्याची किती कामं झाली. ते म्हणत होते की पुन्हा निवडून येणे कठीण आहे. तेव्हा मी म्हटलं त्या मोठ्या माणसाला सरकरमधून बाजूला करावं लागेल, तो मोठा माणूस कोण आहे हे मी सांगत नाही, अशी टीका नाव न घेता शिंदेंनी कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर केली.