जळगाव : उध्दव ठाकरेंनी जळगावात सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. या टीकेला आज एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून प्रत्युत्तर दिले आहे. अनेक विकास काम होत असल्याने अनेकांना पोटदुखी झाली, पोटदुखीचा आजार झाला आहे. त्यासाठी आगामी काळात डॉक्टर आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करू आणि त्यांचा उपचार करू, असा टोला शिंदेंनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, नरेंद्र मोदींशिवाय विकास नाही म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो. हे सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून गतिमान झालं. गेले अडीच वर्ष हे सरकार थांबलं होत. थांबलेले योजना प्रकल्प सुरू केले. केंद्राचे 6 हजार आणि सरकारचे 6 हजार असे शेतकऱ्याला वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहेत. शेतकरी हा आपला मायबाप आहे अन्नदाता आहे.
आम्ही भीमाशंकर, शिर्डीला गेलो त्यावर विरोधकांनी टीका केली. मी माझ्यासाठी काही मागितलं नाही तर शेतकऱ्यांसाठी मागितलं. अनेक विकास कामं होत असल्याने अनेकांना पोटदुखी झाली. पोटदुखीचा आजार झाला आहे. त्यासाठी आगामी काळात डॉक्टर आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करू आणि त्यांचा उपचार करू. हा कार्यक्रम आमची पब्लिसिटी करण्याचा नाही. तुम्ही घरात बसा, असाही निशाणा त्यांनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे.
ताळतंत्र सुटल्यासारखं काहीही काही लोक बोलायला लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू लागेल. हजारो लोक आमच्या कार्यक्रमाला आल्याने विरोधकांना पोटदुखी होत आहे. शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये, हेलिकॉप्टर मध्ये फिरू नये ही कोणती पोटदुखी, असा सवालही एकनाथ शिंदेंनी विचारला आहे.