मुंबई : ठाण्यातील बिल्डर सुरज परमार आत्महत्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच, या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणीही राऊतांनी केली आहे. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. सर्व चौकशांना सामोरे जायला तयार आहे. हे सरकार पूर्णपणे पारदर्शक काम करणारे आहे. लपून-छपून काम करणारे सरकार नाही. त्यांनी एनआयटीचा आरोप केला होता. मात्र, ते तोंड घशी पडले, कोर्टाने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे.
विरोधकांनी विदर्भाच्या मुद्द्यांवर चर्चा करायला पाहिजे होती. त्यांचे मुद्दे मांडायला पाहिजे होते. मात्र, त्यांना विदर्भावर प्रेम राहिले नाही. आमची चर्चा करण्याची तयारी पूर्ण आहे. परंतु, त्यांची मानसिकता तशी नाही. केवळ त्यांची राजकारणाची मानसिकता आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावं आहेत. ती नावं कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत. त्यांच्याविरोधात एसआयटी चौकशी लावा. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे आणि भाजपा त्यांना पाठीशी घालत आहे. लावा चौकशी, एसआयटी नेमा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती.