मुंबई : कोकणातील रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. पंचक्रोशीतील ग्रामस्थ याठिकाणी दाखल झाले असून सर्वेक्षण थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला असून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. यामध्ये काही महिलाही जखमी झाल्याचेही समजत आहे. यावर आता राजकारण पेटले असून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी स्वतः उद्योग मंत्र्यांशी बोललोय जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या सोबत माझी चर्चा झाली आहे. सध्याची परिस्थिती शांतता असल्याचं सांगण्यात आलं आहे. कुठल्याही प्रकारच्या लाठीचार्ज त्या ठिकाणी झाला नाही अशा प्रकारची माहिती कलेक्टर आणि सीपीने मला दिलेली आहे. हे सर्व आमचे भूमिपुत्र आहेत त्यांच्या इच्छेविरुद्ध कुठलाही प्रकल्प आणून त्यांच्यावर अन्याय करायचा नाही. 70 टक्के शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे आंदोलनात काही स्थानिक होते तर काही लोक बाहेरची होती, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.
कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवरती अन्याय करून जोर-जबरदस्तीने कुठलीही प्रक्रिया होणार नाही, अशी भूमिका सरकारची आहे. प्रकल्प त्या भागातील लोकांना रोजगार देणार आहे त्यामुळे 70 टक्के पेक्षा अधिक लोक त्या प्रकल्पाच्या बाजूने आहे. जे लोक विरोधात आहेत त्यांना देखील प्रकल्पाची माहिती प्रशासनाकडून दिली जाईल. या प्रकल्पाचा फायदा त्या लोकांना कसा होईल हे देखील त्यांना सांगितले जाईल, त्यांच्या सभा घेतल्या जातील, त्यांच्या संमतीनेच हा प्रकल्प पुढे नेला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी शांत रहावे कुठल्याही परिस्थितीत तुमच्यावर जोर जबरदस्ती सरकारच्या माध्यमातून केले जाणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे सर्वसामान्यांवरती अन्याय करणारा नाही. हिंदुहदय सम्राट बाळासाहेब समृद्धी मार्ग यालाही विरोध झाला होता मात्र लोकांना त्या प्रकल्पाची माहिती व फायदा मिळाल्यानंतर स्वतःहून लोक पुढे आले. इथे प्रकल्प आल्यानंतर स्थानिक लोकांनाच याचा फायदा होणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री यांनी स्वतः पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं की हा प्रकल्प इथेच करावा मग माझा आणि जनतेचाही प्रश्न आहे ज्यावेळेस तुमची संमती होती मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्याला विरोध करायला अशी दुटप्पी भूमिका का घेता? विरोधाला त्याला विरोध न करता वस्तुस्थिती लक्षात घेऊन काम केलं पाहिजे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
एकीकडे आपण म्हणतात उद्योग दुसरीकडे जातात. पण राज्यात असलेले उद्योग इकडे 70 टक्के लोकांना उद्योग पाहिजे असेल. तर इतर काही लोक राजकीय भांडवल करत आहेत. त्यांना माझं आवाहन आहे की शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर करून द्यायला पाहिजे. त्यांचे नुकसान होणारा निर्णय घेण्यासाठी त्यांना भाग पाडू नये. संबंधित प्रशासन अधिकारी संबंधित शेतकरी गावकरी व जमीन मालकाची बोलून मार्ग काढतील, असेही त्यांनी म्हंटले.
विरोधी पक्षांना राजकारण करण्यापेक्षा दुसरं काही सुचत नाही. जो प्रकल्प अडीच वर्षे ठप्प होता. तो आम्ही आठ महिन्यात सुरू केला. सर्व अडवलेले प्रलंबित राहिलेले प्रकल्प आम्ही पुढे नेतोय व त्यांना चालना देतो. हे मुख्यमंत्री म्हणून मी सांगण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्राची जनता पाहते. जे अडीच वर्ष सर्व प्रकल्प अहंकारामुळे अडवले होते. ते आम्ही पुढे नेतो याचं त्यांना दुःख आहे, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला आहे.