eknath shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या घोषणांनी लक्ष वेधून घेतलं. त्यांनी आपल्या घोषणांमधून भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना टोले लगावले. सभागृहात जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदार जवळ येताच '50 खोके, एकदम ओक्के', 'आले रे आले गद्दार आले', अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. (eknath shinde instructions to rebel mlas respond to the opposition accusations monsoon session)
शिंदे सरकारचे पहिले आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी पूर्ण केली आहे. यानुसार अधिवेशन सुरु होण्याआधीच विरोधक आक्रमक होत विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. यावेळी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शिंदे गटाच्या आमदारांचं विधिमंडळ परिसरात आगमन होताच, आले रे आले गद्दार आले... 50 खोकेवाले आले... अशा शब्दांत आदित्य ठाकरेंसह विरोधकांनी जोरदार घोषणा देत शिंदे गटाला हिणवलं. आदित्य ठाकरेंचे शब्द आणि हिणवण्याची भाषा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिव्हारी लागली आहे. या साऱ्या प्रकारानंतर विरोधकांना जशास तसे उत्तर द्या, असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना दिले आहेत.
विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांशी खाजगीत बोलताना विरोधकांना जशास तसं उत्तर देण्याची सूचना केली. विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तरे द्या, अजिबात शांत बसू नका. आपलं सरकार कसं चांगलं काम करते आहे, हे लोकांना पटवून सांगा, असे आदेश देतानाच आपण लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे आपलं वर्तन व्यवस्थित असलं पाहिजे.