नागपूर : कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरु असून पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं आहे. यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. लोकांवर अन्याय करुन कुठलाही प्रकल्प लादणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत काल माझी फोनवर चर्चा झाली होती. बारसूच्या रिफायनरीबद्दल त्यांचं म्हणणं होतं की उद्योगमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांनी लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. आपलं सरकार लोकांना विश्वासात घेईल, असे मी त्यांना सांगितलं आहे. ज्याप्रमाणे आपण समृद्धी महामार्ग केला त्याचप्रमाणे बारसूतील शेतकऱ्यांना विचारात घेऊन हा प्रकल्प पुढे नेण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
आपण तिथे बोअर करत असून माती परिक्षण करत आहे. त्यानंतर पुढची प्रक्रिया आहे. तात्काळ तिथे प्रकल्प उभा राहतो आहे का? सगळी प्रक्रिया झाल्यानंतरच प्रकल्प होईल. त्यामुळे तिथल्या भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होईल, असे उत्तर त्यांनी विरोधकांना दिले आहे.
दरम्यान, बारसू येथे प्रकल्प होण्यासाठी उध्दव ठाकरेंनीच पत्र दिल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला होता. यावर अखेर आज उध्दव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मी पत्र दिलं होतं, पण तो प्रकल्प लोकांना दाखवा त्यांच्या मनातले संशय दूर करा हे मी बोललो होतो, असे उत्तर त्यांनी दिले आहे. परंतु, पोलीस सगळ्यांच्या घरात घुसून केसेस टाकून, टाळकं फोडून सांगत आहेत. ती ग्रीन रिफायनरी आहे तर मग मारझोड कशाला करतात? असा सवाल त्यांनी केला.