प्रशांत जगताप | सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्यातील मूळ गावी दरे येथील दौऱ्यावर आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची माहिती समोर येत आहे. पाऊस आणि धुक्यामुळे हेलिकॉप्टर दरे गावात उतरवणे शक्य झालं नाही. त्यामुळे ऐनवेळी हेलिकॉप्टरचे लँडींग दुसऱ्या हेलिपॅडवर उतरवण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे हे दोन दिवस दरे गावच्या दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा खाजगी दौरा आहे. दरम्यान, महाबळेश्वर येथे खराब हवामान असल्याने हेलिकॉप्टर दरे या ठिकाणी उतरू शकले नाही. शिवसागर जलाशयाचे पाणी वाढल्याने दरे येथील हेलिपॅड हे पाण्याखाली गेले असून त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरू शकले नाही.
त्यामुळे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर साताऱ्यातील सैनिक स्कूल या ठिकाणी उतरवण्यात आले आहे आणि त्यानंतर वाहनाने कास बामणोली मार्गे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ दरेगावी येथे जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून सातारा सैनिक स्कूल येथील हेलिपॅडवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.