मुंबई : राज्यभरात दिवाळी साजरी केली जात असून राजकीय नेत्यांकडूनही अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. ठाण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. आम्ही तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडले. त्याचा आवाज आजही घुमतोय, असा निशाणा त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर साधला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवाळीनिमित्त फटाके फुटत आहेत. पण, आम्ही तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडले आहेत. त्याचा आवाज आजही घुमतोय. विरोधक म्हणणार नाही. पण, आमचे जे काय हितचिंतक आहेत ते त्या फटाक्याचा आवाज आजही डेसिबलमध्ये मोजत आहेत. मोजू देत. आम्ही बेधडक कार्यक्रम केला, असा टोला त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.
तत्पुर्वी, भारत विरुध्द पाकिस्तान सामन्याचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांनी राजकीय फटकेबाजी करत विरोधकांवर टीका केली होती. टीम इंडियाचा विजय हा आनंदाचा क्षण आहे. तोही उत्सवच आहे. तुम्ही पाहिलं असेल मेलबर्नमध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकली. स्टेडियममध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर झळकवण्यात आले होते. कालची मॅच टीम इंडियाने जशी जिंकली. तशीच आम्ही तीन महिन्यापूर्वी एक मॅच खेळलो आणि जिंकलीही. ती या देशाने आणि महाराष्ट्राने पाहिली. ती तुम्हालाही आवडली म्हणून तुम्ही इथे आहात, असे शिंदेंनी म्हंटले होते.
दरम्यान, राज्यात पावसांनी धुमाकूळ घातला आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर जोरदार टीकाही केली होती. उध्दव ठाकरेंच्या या दौऱ्यावर भाजप-शिंदे गट टीका करताना दिसत आहेत.