औरंगाबाद : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने धाड टाकली आहे. सात तास उलटूनही राऊत आणि कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. यावरुन कर नाही त्याला डर कशाला, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संजय राऊतांना लगावला आहे. ते आज औरंगाबाद दौऱ्यावर आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, संजय राऊत यांची चौकशी चालू आहे. मी अधिकारी नाही, मला माहित नाही. कर नाही त्याला डर कशाला, असे म्हणत चौकशी होऊ द्या पुढे जे येईल ते पाहू, असे त्यांनी म्हंटले आहे.
तर, संजय राऊतांकडून मरेन पण शिवसेना सोडणार नाही, अशी विधाने केली जात आहेत. यावर त्यांना भाजपमध्ये येण्याचे कुणी निमंत्रण दिले नाही. ईडीच्या भीतीने कुणी भाजप आणि आमच्याकडे येऊ नका. मी आवाहन करतो कुणी आमच्याकडे येण्याचे पुण्याचे काम करू नका, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत आणि अर्जुन खोतकर यांना टोला लगावला आहे.
शिवसेनेने सुडबुध्दीने कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे. पण, सूडाच्या कारवाई करण्याची गरज काय, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. आमच्याकडे येणाऱ्या एका तरी आमदाराने सांगावे की ईडीची नोटीस आली म्हणून आलो, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या भांडुपनंतर कांजूरमार्ग आणि दादर येथील घरावरही ईडीने धाडी टाकल्या आहेत. कांजूरमार्ग येथील मैत्री बंगला आणि दादर येथील गार्डन कोर्ट येथील घरावर हा छापा टाकला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, संजय राऊत यांच्या घरावर छापा पडल्याचं कळताच शिवसैनिकांनी त्यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली.