पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भव्य रोड शो केला आहे. तब्बल साडेचार तास ही रॅली सुरु होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ज्यांच्याकडे पाणी मागितलं त्यांनी धरण दाखवलं, असा जोरदार टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.
आपला वाघ हेमंत रासने आहे. त्याला निवडून आणायचं आहे. रॅली शो करताना रस्त्यावर आणि सगळीकडे माणसंच माणसे होती. असे दुर्लभ चित्र कसब्यात पाहायला मिळाले. सर्वांना अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. कसबा पेठ भाजप आणि शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे. आज गिरीश बापट यांना सांगितलं तुम्ही प्रचाराला येऊ नका. पणं, त्यांच्यातला कार्यकर्ता जागा झाला आणि ते आले, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मी जनतेमधला मुख्यमंत्री आहे. आम्हाला कृष्णतीरी आत्मक्लेश करायची वेळ आली नाही. ज्यांच्याकडे पाणी मागितलं त्यांनी धरण दाखवलं. त्यावर आता बोलणार नाही, असा टोला मुख्यमंत्र्यानी अजित पवारांना लगावला आहे. माझ्या तोंडातून अनवधानाने एक वाक्य निघालं की एमपीएससी आयोगऐवजी निवडणूक आयोग निघाले. पणं एक सांगतो की निवडणूक आयोग असो किंवा लोकसेवा आयोग निकाल महत्वाचा असतो, तो आम्ही दिलाय, असे खोचक विधानही त्यांनी केले.