शिवसेनेतील फुटीर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा मनसे नेते राज ठाकरे यांच्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा अॅक्टीव्ह झाले आहेत. आज त्यांनी शिवतीर्थावर मनसे नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होणार आहे.
राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून नुकताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज ठाकरे यंनी स्वतः ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. आपल्या आशीर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली आहे. काही वेळापूर्वीच रुग्णालयातून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपला आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम असू द्या, अशा आशयाची पोस्ट करत राज ठाकरे यांनी जनतेचे आभार मानले आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा फोन केला. या फोननंतर शिंदे गट मनसेत जाण्याची चर्चा सुरु झाली आहे.
मनसेच का
एकनाथ शिंदे यांना दोनतृतीयांशपेक्षा जास्त म्हणजेच 37 आमदारांचा पाठिंबा आहे. परंतु त्यानंतरही विधानसभेत वेगळ्या पक्षाची मान्यता मिळणे सोपे नाही. बंडखोर गटाला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी या समस्येवर तोडगा काढायचा असेल, तर त्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतःला एखाद्या पक्षात विलीन करणे आहे. यामुळे शिंदे गट मनसेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. मनसे आणि एकनाथ शिंदे दोघांनाही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हवी आहे. हिंदुत्व हवे आहे. तसेच राज ठाकरे यांनी भाजपशी जुळवून घेतल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे.