मुंबई : उध्दव ठाकरेंची ही भूमिका दुटप्पी आहे. सावरकरांचे हिंदुत्व मान्य असेल तर कर्तव्यातून दाखवावे. बाळासाहेब असते तर राहुल गांधींना जोडे मारले असते. तसेच, निमूटपणे सहन करणाऱ्यांना जोडे मारले असते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे. वीर सावरकरांबाबत राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान राहुल गांधींकडून होतो आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. खऱ्या अर्थाने ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आंदोलनात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण घेतोय. म्हणून देशात लोकशाही आहे. खऱ्या अर्थाने ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी त्याग करून स्वातंत्र्य मिळवले. त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा निषेध देशभर होतो आहे. राहुल गांधी सुद्धा हे स्वातंत्र्य उपभोगत आहेत.
राहुल गांधींनी अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये एक दिवस जावे. त्यांना कल्पना येईल. म्हणून त्यांच्या कृतीचा निषेध सर्वांनी करायला हवा होता. ज्यांनी त्यांचा अवमान केला, ते वारंवार सांगत आहेत. मी सावरकर नाही गांधी आहे. सावरकर व्हायची तुमची लायकी नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींना सुनावले आहे.
या देशाची तुम्ही निंदा परदेशी जाऊन करता. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप समजू शकतो. मात्र, देशाची निंदा परदेशात करणे हा देशद्रोह आहे. सावरकरांच्या अपमान करणाऱ्या वृत्तीची निंदा करतो.
कितीतरी क्षेत्रात सावरकरांचे योगदान आहे. ते महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाचे दैवत आहे. अधिवेशनात एकही शब्द काढला नाही. जे हिंदुत्व म्हणणारे नेते आहेत त्यांनी हिम्मत केली नाही. उलट काळ्या फिती लावून राहुल गांधी यांची खासदारकी गेली म्हणून पायऱ्यांवर बसलेले आपण पाहिले. सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे काल म्हणाले. त्यांचे आमदार अधिवेशनात मूग गिळून गप्प होते, असा निशाणा त्यांनी ठाकरे गटावर साधला आहे.
सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, म्हणजे काय करणार? हे त्यांना विचारा. मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत बाळासाहेबांनी दिली होती. तुम्ही राहुल गांधींच्या थोबाडीत देणार का, असा प्रश्न विचारत ते पुढे म्हणाले, उशिरा सुचलेले शहाणपण आहे. जो भडीमार झाला त्यानंतर सुचलेले शहाणपण आहे. एक मारल्यासारखे करतो, तर दुसरा रडल्यासारखे करतो.
आज पक्षीय भेद बाजूला ठेवत लोक रस्त्यावर उतरले. विधानसभेच्या प्रांगणात आमच्या आमदारांनी केलेले आंदोलन तो संताप आहे, चीड आहे. जे स्वातंत्र्यवीरांविरोधात बोलतील, त्यांच्या विरोधात रस्त्यावर जनता उतरेल. वारंवार विरोधात वक्तव्य केले जाते. राहुल गांधी यांचा जाहीर धिक्कार करतो. जनतेत चीड व असंतोष आहे. त्यामुळे याठिकाणी राज्यभर सावरकरांबाबत त्याग व देशभक्ती आहे. या समर्पणानिमित्त जिल्हा, तालुका, विधानसभा क्षेत्रात सावरकर गौरव यात्रा सुरु करणार आहेत, अशी घोषणाही एकनाथ शिंदे यांनी केली.