मुंबई : राज्यात सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ सुरु आहे. महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेचा 'दसरा मेळावा' हायजॅक करण्यात येणार आहे. दसरा मेळाव्याची परवानगीसाठी शिंदे गटाने मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहे.
शिवसेना आणि दसरा मेळावा हे नाते सर्वांनाच माहित आहे. दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये दसऱ्या मेळाव्यानिमित्त ठाकरे कुटुंबियांकडून शिवसैनिकांना बळ देण्यात येते. यानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावतात.
मात्र, यंदा शिंदे गटाच्या बंडाळीमुळे शिवसेनेत दोन गट पडले आहे. शिंदे सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर एकनाथ शिंदे यांनी आम्हीच खरी शिवसेना म्हणत पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. हे प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. तरीही शिंदे गटाने आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही हक्क सांगितला आहे.
शिवसेनेनेही दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला असून परवानगीसाठी पालिकेत प्रलंबित आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून शिवसेनेने पालिकेवर पक्षपातीपणाचे आरोप केले आहे. परंतु, शिंदे गटाने हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र, आज दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. यंदा पाच ऑक्टोबर रोजीच्या दसऱ्यानिमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरुन रस्सीखेच सुरु झाल्याचे समजत आहे.दरम्यान, शिंदे गटामुळे शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा खंडीत होणार का, असा प्रश्न पडला आहे.