नंदकिशोर गावडे | बेळगाव : कर्नाटक सरकार महाराष्ट्राला डिवचण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. काल जत तालुक्यात पाणी सोडल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. सीमाभाग समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटलांना बेळगावाला पाठवू नये, असा संदेशच बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सचिवांना पाठविला आहे.
महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमा भागावरील बेळगावचा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारची बैठक झाली होती. यामध्ये सीमा भागातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने दोन मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. यात चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. यानुसार चंद्रकांत पाटील उद्या बेळगाव दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना संदेश पाठवला आहे, अशी माहिती बोम्मई यांनी दिली. रामदुर्ग तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री बोम्मई यांनी सालहळ्ळी येथे आज पत्रकारांशी संवाद साधला.
सध्या दोन्ही राज्यातील परिस्थिती लक्षात घेता चंद्रकांत पाटलांनी बेळगावला येऊ नये, अशी विनंती कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी एका संदेशाद्वारे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाला केली आहे. यापूर्वीही अनेकदा अशा पद्धतीचे प्रयत्न झाले असले तरी कर्नाटक सरकारने त्याविरुद्ध जे क्रम घेतले तेच क्रम यावेळीही घेतले जातील, असे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जतच्या सीमावर्ती भागातील 40 गावावर दावा करणाऱ्या कर्नाटकने बुधवारी तुबची योजना सक्रिय करत पाणी जत पूर्व भागात सोडले आहे. यामुळे तिकोंडी येथील साठवण तलाव एका दिवसात ओवरफ्लो झाला. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. जत तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी 2 हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे.