सुरेश काटे | कल्याण : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोविडच्या सुरुवातीच्या काळात राज्यातील डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीपासून पळून गेले, असे विधान केले होते. त्यानंतर या विधानाचे पडसाद सर्वत्र उमटले.
राज्यातील विविध डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांनी या वक्तव्याचा निषेध केला. आयएमएसह प्रमुख संघटनांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. कल्याण आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली भूमिका मांडली. त्यानंतर थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मध्यस्थी करत डॉक्टरांची समजूत काढावी लागली.
काय म्हणाले होते संजय राऊत?
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना 'कोवीडच्या सुरुवातीच्या काळात राज्यातील डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीपासून पळून गेले असे विधान केले.
काय म्हणाले कल्याण आयएमए अध्यक्ष प्रशांत पाटील?
संजय राऊत यांचे विधान फार वेदनादायक होतं. पहिल्या लाटेत कल्याण डोंबिवलीतील खाजगी डॉक्टरांसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील डॉक्टर ठाकरे सरकारबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत होते. त्यानंतर हे विधान आल्यानंतर आम्हाला खूप वेदना झाल्या. याचा रोष आम्ही कल्याणमधील ठाकरे गटाचे स्थानिक नेते विजय साळवी यांच्याकडे मांडला आणि ही बाब उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली आणि उद्धव ठाकरेंनी स्वतः फोन करत हे गैरसमजतातून झाले. आम्हाला डॉक्टर, नर्सबद्दल नितांत आदर आहे. कोविडवर मात डॉक्टर, नर्सेस इतरांच्या साहाय्याने करू शकलो, असे म्हणत त्यांनी आमची समजूत काढली. त्यानंतर या वादावर आता पडदा पडला, असे प्रशांत पाटील यांनी सांगितले.