गेला आठवडाभर चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अशात चितमपल्ली येथे तलाव फुटल्याने तर पिंपळखुट येथे अंधारी नदीच्या पुराने प्रचंड मोठे नुकसान नागरिकांना सहन करावे लागले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दोन्ही गावात नागरिकांच्या भेटी घेत पुराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मदत वितरित केली. या गावामध्ये अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घरातील धान्यांची नासाडी झाली आहे. घरातील कपडे आणि इतर साहित्य पाण्यासोबत वाहून गेले आहे. या संकटाच्या काळात शेवटच्या नुकसानग्रस्त गरजूपर्यंत मदत पोहचविण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांना तेल, मीठ, तिखट, धान्य, कणीक यासोबतच कपडे देण्यात येईल. तसेच गाद्या, चादर, ब्लँकेटची व्यवस्था केली जाणार आहे असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
चितमपल्ली येथील पूरपीडित कुटुंबाना पहिली मदत म्हणून 5 हजार तात्काळ जमा होणार आहे. पाऊस ओसरल्यानंतर फुटलेल्या तलावाची कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पंचनाम्यापासून एकही घर सूटणार नाही, याची काळजी घेत पंचनाम्याची यादी ग्रामपंचायतीमध्ये जाहीर करावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.