नागपूर : हिवाळी अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची केस रिओपन करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांकडून लावून धरण्यात आली आहे. यामुळे सभागृहातच मोठा गोंधळ पाहायला मिळाला. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दिशा सालियन प्रकरणाची चौकशी कधीच सीबीआयकडे नव्हती. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. दिशा सालियन प्रकरणात सीबीआयला विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी हे प्रकरण आमच्याकडे नाही, असे सांगितले होते. त्यासंदर्भात सीबीआयचा कोणताही क्लोजर रिपोर्ट नाही. याबाबत जे काही पुरावे मांडले जात आहेत. त्याच्या आधारावर कोणताही राजकीय आकस न ठेवता निष्पक्षपणे चौकशी करण्यात येईल.
दिशा सालियनचे प्रकरण मुंबई पोलिसांकडे आहे. याप्रकरणाचे ज्यांच्याकडे पुरावे असतील, त्यांनी द्यावे. यासंदर्भात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल, अशी घोषणा फडणवीसांनी विधानसभेत केली आहे.
खासदार राहुल शेवाळेंच्या आरोपानंतर भरत गोगावले यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा उल्लेख केला. त्यानंतर नितेश राणेही बोलायला उभे राहिले. A फॉर आफताब पुनावाला, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच! श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात जसं आफताब पुनावालाची नार्को टेस्ट झाली आणि सत्य बाहेर आलं. तसंच आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा. सुशांतसिंह केसमधील सत्य समोर येईल, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
तर, दिशा सालियन प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. बिहार पोलिसांकडून येऊ आदित्या ठाकरेंचे नाव सांगण्यात आल्यानंतर अधिवेशन चार वेळा तहकूब करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांचे इतर मुद्दे बाजूला सारून दिशा सालियन प्रकरणी हे चार वेळा तहकूब झाले. काही जरी झालं तरी चौकशी व्हायला हवी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.
काय होता दिशा सालियनचा सीबीआय रिपोर्ट?
दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणाशी कोणताही संबंध नाही. दिशाचा मृत्यू अपघातीच असल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले. 8 जूनच्या रात्री दिशाने एक पार्टी आयोजित केली होती. त्यात ती मद्यधुंद अवस्थेत 14 व्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून खाली कोसळली असल्याचे सीबीआयने माहिती अहवालात दिली होती.