दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली होती तसेच त्यांच्यावर टीका होऊ लागली. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या वक्त्याव्याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, गेली ५० वर्षे शरद पवारांनी या राज्यासाठी, देशासाठी काम केलं आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातले अनेक पक्ष स्वतःच्या हिंमतीवर बहुमत मिळवून सत्तेवर बसले आहेत. मात्र महाराष्ट्रातली जनता शरद पवार यांच्या मागे उभी राहिली नाही, याची मला खंत आहे. मी खंत व्यक्त करत होतो, आणि हे मी या आधीही बऱ्याचवेळा बोललो आहे. त्यात शरद पवारांना कमी लेखण्याचा किंवा त्यांच्याविषयी काही चुकीचं बोलण्याचा प्रश्न येत नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. शरद पवार हे आमचे नेते आहेत, तेच भविष्यातही आमचे नेते राहतील असंही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.