मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेनेला धक्का देत धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना हे पक्षाचं नावही दोन्ही गटांना सध्या वापरता येणार नाही. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक पार पडेपर्यंत दोन्ही गटांना हे निर्बंध लागू असणार आहेत. यावर प्रथमच उध्दव ठाकरे यांनी प्रतिक्रया दिली आहे.
मुंबईमधील अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरील हक्कासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये वाद सुरु होता. मात्र, आता निवडणूक आयोगाचा याबाबत मोठा निर्णय घेत ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावण्याचा निर्णय घेतला आहे. यावर राजकीय वर्तुळातून टीका करण्यात येत आहेत. अशाताच उध्दव ठाकरेंनी इन्स्टाग्राम पोस्टवरुन पहिली प्रतिक्रिया दिला आहे. या पोस्टद्वारे जिंकून दाखवणारच, असा निर्धार केला आहे. सोबत हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. उध्दव ठाकरेंच्या या पोस्टला शिवसेना नेते अंबादास दानवेंनी साहेब लढू आणि जिंकूही, अशी कमेंट केली आहे.
तर, केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. खोकेवाल्या गद्दारांनी शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केलाय. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. आणि लढणार आणि जिंकणारच त्याचबरोबर आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, असंही आदित्य ठाकरे यांनी ट्विट केला आहे. तसेच, "शिवसेना".... हा पक्ष फिनिक्स सारखी भरारी घेतल्या शिवाय राहणार नाही, अशी विश्वास सचिन अहिर यांनी व्यक्त केला आहे.