कल्पना नळसकर| नागपूर: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोज नवनवीन विषयावरून जुंपलेली दिसत आहे. तर दुसरीकडे पाठोपाठ वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद देखील अधिकच तीव्र झाला आहे. या वादादरम्यान आता उद्यापासून नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. याच अधिवेशाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत काही विषयांवर भाष्य केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले. तेव्हा त्यांनी नवीन लोकायुक्त कायदा अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले.
काय म्हणाले फडणवीस?
मागील तीन वर्षात मुंबईत कोरोना नव्हता म्हणून अधिवेशन होत होते आणि पण नागपूरात होत नव्हते. तीन वर्षानंतर विरोधकांना नागपुरात येण्याची संधी मिळाली. सर्वांचं मी स्वागत करतो. मला आज अतिशय आनंद वाटला की, अजित दादांना विदर्भाची आठवण आली. मुंबईत कोरोना नव्हता त्यामुळे अधिवेशन व्हायचं आणि नागपुरात कोरोना होता म्हणून अधिवेशन होत नव्हतं, अशी विडंबना आपण मागच्या काळात बघितलीय, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अजित दादा म्हणाले हिवाळी अधिवेशन तीन आठवड्याचं का नाही? आमची तर चार आठवड्याचं अधिवेशन करायलाही तयारी आहे. पण हा प्रश्न कुणी विचारायचा? ज्यांनी एक आठवड्याचं अधिवेशन तरी घेतलं असेल त्यांनी विचारायचं. ज्यांनी एकही आठवड्याचं अधिवेशन घेतलं नाही त्यांनी ते तीन आठवड्याचं अधिवेशन का नाही घेत? असं विचारतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सविस्तर त्याबाबत सांगतीलच. अण्णा हजारे सातत्याने मागणी करत होते, ज्या प्रकारे केंद्रात लोकपाल विधेयक झाले तसे महाराष्ट्रात कायदा झाला पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात लोकायुक्त आणणार आहोत. याच अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनाही लोकआयुक्ताच्या कक्षेत आणण्याचं काम करण्यात येणार आहे.
अण्णा हजारे यांच्या समितीचा रिपोर्ट सरकारने स्वीकारला आहे. नवीन लोकायुक्त कायद्याला मुख्यमंत्री यांनी मजुरी दिली आहे. राज्यात पहिल्यादा मुख्यमंत्री यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणणार आहोत. मंत्रिमंडळ देखील लोकायुक्तात येईल. अँटी करप्शन ऍक्टला लोकायुक्ताचा भाग केले आहे. पाच जणांची समिती केली दोन जणांचा बेंच असणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सहा महिन्यात काय केलं विरोधक विचारत असताता. आम्ही 6 महिन्याच्या काळात भ्रष्ट्राचार विरोधी कायदा केला आहे. याच अधिवेशनात लोकायुक्ताचं बील मांडणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.