राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलेले दिसून आले. मात्र, या विधानाचे पडसाद आजही कायम आहे. शरद पवार, उध्दव ठाकरे या प्रमुख नेत्यांसह विरोधकांनी राज्यापालांवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच त्यांना राज्यपाल पदावरुन हटवण्याची मागणी देखील जोर धरु लागली असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारींची पाठराखण केली आहे.
ठाण्यातील योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनात अमृता फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे एकमेव असे राज्यपाल आहेत. ज्यांनी महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकली. मराठी बोलण्याच्या वेगात ते काही बोलून जातात. त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. ते मनापासून महाराष्ट्र आणि मराठी माणसावर प्रेम करणारे आहेत.
मराठी माणसांवर त्यांचं खूप प्रेम आहे. हे मी स्वत: देखील अनुभवलं आहे. मात्र, अनेक वेळा त्यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला जातो. यापूर्वीही अनेकदा असं घडलं आहे. मात्र, त्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे अशा शब्दात फडणवीसांनी राज्यपालांची पाठराखण केली आहे.