राजकारण

आम्ही काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो; अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी

हिवाळी अधिवेशनात विकासकामांच्या स्थगितीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. यावरून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विधानसभेत विकासकामांच्या स्थगितीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारने तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळातील विकासकामांना स्थगिती दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरून अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील विकासकामे थांबवू कसं शकतं ? महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेली विकासकामं महाराष्ट्रातील आहेत. कर्नाटक, गुजरात किंवा तेलंगणातील नाहीत. शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याने राज्यभरातील विकासकामांवर परिणाम होत असून राज्याचं नुकसान होत आहे. सरकारनं सूडबुद्धीनं राज्यभरातील विकासकामे थांबवली आहेत. यापूर्वीही राज्यानं अनेक सरकारं बघितली, पण असं कधी झालं नव्हतं, असा घणाघात अजित पवारांनी सभागृहात केला. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.

तुम्ही 7-7 वेळा निवडून आला आहेत. आम्ही कमी आलोय. पण, काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो. ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा आमची सगळी विकासकामं रोखण्याचं काम तुम्ही केलं होतं, असे त्यांनी म्हंटले आहे.

ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार आलं. तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, त्यावेळी आमची सगळी कामं रोखण्याचे काम तुम्ही केलं होतं. माझ्या स्वतःच्या मतदार संघातील कामे तुम्ही रोखली होती. अडीच वर्ष भाजपच्या लोकांना एक नवा पैसा तुम्ही दिला नाही, असा आरोपही त्यांनी केला.

पण, आम्ही बदल्याची भावना ठेवणार नाही. ज्या स्थगित्या दिल्या होत्या. त्यातील 70 टक्के कामांवरील स्थगिती रद्द करण्यात आल्या आहेत. तर, 30 टक्के कामांवर स्थगिती ठेवण्यात आली आहे. कारण त्यामध्ये निधी वाटप करताना तरतुदीचा कोणताही नियम पाळण्यात आला नाही. जिथे 2 हजार कोटीची तरतूद हवी होती. त्याठिकाणी 6 हजार कोटी वाटण्यात आले आहेत. आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपय्या अशी अवस्था आहे. त्याही संदर्भात योग्य निर्णय होईल. भेदभाव करण्यात येणार नाही, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी