मुंबई : उध्दव ठाकरे यांनी नागपुरातील सभेत हा तुमच्या नागपूरला कलंक आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. यावरुन भाजप पक्ष आक्रमक झाला असून जोरदार टीका करण्यात येत आहे. परंतु, उध्दव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत विधानावर ठाम असल्याचे म्हंटले आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मला याचं अत्यंत दुःख आहे की, आमचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर आताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरित परिणाम झाला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांना मानसोपचारतज्ज्ञांची गरज आहे. अशा मानसिकतेतून एखादी व्यक्ती बोलत असेल तर मला वाटतं की त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. त्यांच्या मानसिक स्थितीवर, व्यवहारावर मला दया येतेय, अशा शब्दात फडणवीसांनी उध्दव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
दरम्यान, भाजपकडून झालेल्या टीकेनंतर उध्दव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा फडणवीसांवर शरसंधान साधले होते. इतकं वाईट वाटण्यासारखं काय आहे? भ्रष्ट माणसाला तुम्ही भ्रष्ट म्हणता की नाही? हसन मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. लोकांना कलंकित करून तुम्ही नंतर त्यांच्यासोबत बसता मग तुम्ही कलंकित नाही का, असा सवाल उध्दव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.