पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील राजकारणातील चाणाक्य म्हणून ओळखले जाते. भाजपचे नगरसेवक ते राज्याचे मुख्यमंत्री एवढा मोठा पल्ला गाठल्यानंतर ‘किंगमेकर’ अशीही ओळख त्यांनी निर्माण केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मुख्यमंत्रिपद देऊन पक्षादेशाचा सन्मान करत उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं. याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. परंतु, आता फडणवीसांनी एका कार्यक्रमात मला राजकारणात येण्याची इच्छा नव्हकी, असा खुलासा केला आहे.
पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद बैठक सुरु आहे. दोन दिवस सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेचा देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाने समारोप झाला आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच फडणवीसांनी उपस्थितांची माफी मागितली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीला समृध्दी महामार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमाला दीड तास उशिरा आले. यामुळे त्या कार्यक्रमाला उशिर झाला म्हणून या कार्यक्रमाला येण्यास मला उशीर झाला. मी उशिरा आल्याने माफी मागतो, असे त्यांनी म्हंटले.
यावेळी फडणवीसांनी राजकीय प्रवेशाचा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देतात. माझ्यामध्ये नेतृत्वाच्या गुणांचा विकास अभाविपमुळेच झाला. मी आभिवपमध्ये काम करत होतो. मी राजकारणात येणार नव्हतो. पणं, मला पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले की तुला राजकारणात यावंच लागेल. तेव्हा मी नाही म्हणालो. पण, त्यांनी सांगितले आपल्यात श्रेष्ठींचा निर्णय अंतिम असतो म्हणून मी राजकारणात आलो, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस विधान परिषदेचे आमदार होते. त्यांचं निधन झालं व त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. ते 22 व्या वर्षी नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. 1999 मध्ये ते विधानसभेमध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले. 2013 मध्ये त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. 2014 मध्ये मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालं होते. सध्या ते उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.