कल्पना नलसकर | नागपूर : जुनी पेन्शन योजना मागणीसाठी सुरु असलेला संप सरकारी कर्मचाऱ्यांनी अखेर सात दिवसांनी मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संपकऱ्यांसोबत सकारात्मक बैठक घेतली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानतो. विशेषतः पुढाकार घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांचेही आभार मानतो, असे त्यांनी म्हंटले आहे.
नागपूर येथे माध्यम प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली असता ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारी कर्मचार्यांनी संप मागे घेतला, ही आनंदाची गोष्ट आहे. आज दुपारी माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली होती. आम्ही कुठलाही अहंभाव न बाळगता सरकारी कर्मचार्यांची भूमिका जाणून घेतली. आडमुठी भूमिका कधीच घेतली नाही. सरकारी कर्मचार्यांचे हित पाहणारेच आम्ही आहोत.
सामाजिक सुरक्षेची भूमिका तत्व म्हणून आम्ही आधीच मान्य केली होती. आता चर्चेचे मुद्दे निश्चित करुन समितीपुढे ते ठेवण्यात आले आहेत. समिती त्यावर निर्णय घेईल. पहिल्या दिवशीपासून आम्ही संवादाचा प्रयत्न करीत होतो. आज त्यांनी संप मागे घेतला, याचा आनंद आहे. समितीला 3 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे, त्यामुळे कालबद्ध वेळेतच समिती आपला अहवाल देईल. मी कर्मचार्यांचे अभिनंदन करतो आणि पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचेही विशेष आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, आज जी 20 च्या अंतर्गत सी-20 चे उद्घाटन झालेलं आहे. आज उद्घाटनाच्या सत्राला मी स्वतः उपस्थित होतो. जवळजवळ 26 देशातून त्या ठिकाणी साडेतीनशे लोक आले आहेत. नोबेल पुरस्कार विजेतेदेखील या ठिकाणी होते. १४ विषयांवर वेगवेगळे ग्रुप काम करत आहे, असेही फडणवीसांनी सांगितले आहे.