सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.
नितीन चंद्रकांत देसाई यांचे पोस्टमॉर्टम बुधवारी जेजे रुग्णालयात करण्यात आले. नितीन देसाई यांचा मृतदेह खालापूर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात आणला होता. यावर रायगड पोलिसांनी माहिती दिली आहे की, चार डॉक्टरांच्या पथकाने कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे शवविच्छेदन केले. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण फाशीमुळे झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नितीन देसाई हे चित्रपटसृष्टीतील मोठं नाव होते. मराठी माणसाला अभिमान वाटावे असं त्यांनी कला दिग्दर्शनामध्ये आपले बस्तान बसवलं. केवळ हिंदी चित्रपट नाही तर अनेक राजकीय पक्षांचे मोठे कार्यक्रम व्हायचे त्या कार्यक्रमात कोणती थीम हवी. यासाठी त्यांना बोलवलं जायचे.
त्यांचा हा मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे. त्यासंदर्भात आपण चौकशी करत आहोत. ही गोष्ट खरी आहे त्यांच्यावर काही कर्ज होतं. सर्व अँगल तपासण्यात येतील. त्यांचा स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी काही दबाव करण्यात आला का? त्यांच्यावर जोर जबरदस्ती करण्यात आली का? किंवा त्यांना फसवण्यात आले का? या सगळ्या गोष्टीची चौकशी सरकार करेल.
तसेच एका मराठी माणसानं तयार केलेला हा स्टुडिओ आहे. आज त्याची घोषणा करण्यात येत नाही. कायदेशीर बाबी तपासूण बघू. नितीन देसाई यांची आठवण म्हणून या स्टुडिओचे कशाप्रकारे संवर्धन करता येईल किंवा तो टेकओव्हर करता येईल. हे सर्व कायदेशीर बाबी तपासूण बघून करता येईल. आज त्यावर काही बोलता येत नाही.