मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु असून उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. तर, दुसरीकडे मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. बीडमध्ये काही आंदोलकांनी लोकप्रतिनिधींची घरे आणि कार्यालये जाळली होती. या पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत जे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत राज्य सरकार सकारात्मक पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत कमिटमेंट दिलेले आहे. काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांनी लोकप्रतिनिधी यांची घरे जाळ, दवाखाने जाळ, हॉटेल जाळ असे प्रकार घडत आहेत याची गृह विभागाने गंभीर दखल घेतली आहे.
सर्व व्हिडिओ मिळालेले आहेत. यातील 50 ते 55 लोक ओळखता येत आहेत. 307 चे गुन्हे दाखल केले जात आहेत. कडक कारवाई केली जाईल. हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही. शांतता होत नाही तोपर्यंत कारवाई सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ज्यावेळी अशा घटना घडत होत्या त्यावेळी काही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते असल्याचे कळतंय त्याचे पुरावे देखील प्राप्त झाले आहेत. काही लोक जाणीवपूर्वक हिंसा करत आहेत. सर्व सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळाले आहेत, असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.