मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार का?, तसेच २०२४च्या निवडणुकीत नेतृत्व एकनाथ शिंदेंकडे राहणार की देवेंद्र फडणवीस यांकडे? याबाबत राज्यातील राजकारणात तर्कवितर्क लावले जात आहेत. या सर्व चर्चांना पूर्ण विराम देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच शिवसेना व भाजप २०२४च्या निवडणुका लढणार असल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. लोकशाही मराठी वृत्तवाहिनीने यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात गुरुवारी आयोजित केलेल्या 'लोकशाही संवाद' या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री हा राज्याचा नेता असतो. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून तेच भाजप व शिवसेना युती सरकारचे नेते आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संवाद साधताना म्हटले. उपमुख्यमंत्री म्हणाले की, "आग की बिना धुवा निकलता नही" हे जुने झाले. आता व्हर्च्युअल धुवा निघतो. शिवसेना व भाजप सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. २०२४ची निवडणूक युती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढेल.
सरकारचा नेता हा मुख्यमंत्री असतो, सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे आमचे नेते एकनाथ शिंदे हेच आहेत. या सरकारमध्ये व त्यांच्या नेतृत्वाखाली मी १०० टक्के कम्फर्टेबल आहे. २०१९मध्ये एक पॉज आला होता. मध्यंतरीच्या सरकारने तो आणला होता. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे तो पॉज दूर झाला आहे. २०१४मध्ये मी मुख्यमंत्री असताना सर्व टीम म्हणून काम करत होते. तेव्हा मी चीन लीडर होतो. आता टीम लीडर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मी टीमचा एक भाग आहे. मी या सरकारमध्ये पूर्ण समाधानी आहे. कदाचित मी समाधानी असल्यामुळे अनेकांना त्रास होतोय. ज्यांना त्रास व्हायचा तो होऊ द्या, पण मी समाधानी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.