नागपूर : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला आहे. राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या गटानं जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक केली. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांतता राखण्याचे आव्हान केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुर्दैवी घटना आहे. शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. काहींचा परिस्थिती बिघडविण्याचे प्रयत्न सुरू आहे. नेत्यांनी अशा वेळेस कसे वागले पाहिजे याची काळजी घ्यावी. शहर शांत ठेवणे ही प्रत्येक नेत्याची जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
तर, चंद्रकांत खैरेंच्या आरोपांवरही फडणवीसांनी उत्तर दिले. काही नेते स्वार्थासाठी स्टेटमेंट करत आहे. त्यांनी करू नये. या क्षणी शांतता आहे. ही शांतता राहावी यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागेल. काही नेते स्वार्थासाठी राजकीय वक्तव्य करत आहे. असे वक्तव्य छोट्या बुद्धीने केलेले वक्तव्य आहे, असा टोला त्यांनी खैरेंना लगावला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने कोणतेही निरीक्षण नोंदवले नाही. एक जनरल स्टेटमेंट केलेला आहे. सर्व राज्य सरकारांनी काय केले पाहिजे असे न्यायालय बोलले आहे. जे या बद्दल बोलत आहे. माझे त्यांच्याबद्दल म्हणणे आहे की त्यांना न्यायालयीन कारवाई फारशी समजत नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.