नागपूर : शासन त्यांचे निर्णय आणि सूचना आमच्यावर लादत होते, असा आरोप राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य बी.एल. किल्लारीकर यांनी केला होता. या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले. यावेळी त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी काळात राज्य मागासवर्ग आयोग तयार झाला, तेव्हा तिन्ही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यात सदस्य झाले. आम्ही मागासवर्ग आयोग तयार केला, तेव्हा त्यात अभ्यासक घेतले होते. महाविकास आघाडी सरकारने कार्यकर्त्यांचा त्यात भरणा केला. किल्लारीकर यांनी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिल्यावर पहिली भेट शरद पवार यांची घेतली. सर्वेक्षण कसे करावे आणि त्याची पद्धती काय असावी, हे मागासवर्ग आयोग ठरवीत असते. सरकार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
तसेच, मराठा आरक्षणाचा विषय पूर्णत्वास जाऊ नये आणि तो तसाच खोळंबलेल्या स्थितीत रहावा, अशी ज्या लोकांची इच्छा आहे, तेच यांचे 'पॉलिटिकल मास्टर्स' आहेत. राज्य सरकार मात्र मराठा आरक्षण देण्यावर ठाम आहे, आम्ही त्यासाठी संपूर्ण प्रयत्न करू. खरे तर जो विषय माझ्याकडे नाही, त्यावर त्यांनी बोलणे हे पूर्णपणे राजकारण आहे, त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देण्याची मला गरज वाटत नाही, असेही फडणवीस म्हणाले आहेत.
काय आहेत बी.एल. किल्लारीकर यांचे आरोप ?
सरकार मागासवर्ग आयोगाला गृहित धरत होतं. आमच्या अधिकारात सरकारचा हस्तक्षेप होत आहे. शासन त्यांचे निर्णय आणि सूचना आमच्यावर लादत होते. त्यामुळे आम्ही आमचा राजीनामा दिला आहे, असे आरोप बी.एल. किल्लारीकर यांनी केले होते.