मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी 11 पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. तसेच, शाईफेक करणाऱ्यांवरही 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यात एकच गदारोळ निर्माण झाला होता. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना महत्वाचे आदेश दिले आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. त्या शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे या कार्यकर्त्यांला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चिंचवड पोलिसांनी थेट कलम 307 म्हणजेच जीवे मारण्याचा प्रयत्नाखाली गुन्हा नोंदवला आहे. तर, दुसरीकडे घटनेच्या दुसऱ्याच दिवशी 11 पोलिसांचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तडकाफडकी निलंबन केले होते. यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी मनोज गरबडे यांच्यावर लावण्यात आलेले कलम ३०७ मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, ११ पोलिसांचे निलंबन सुद्धा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. या विधानाचे पडसाद सर्वत्रच दिसून आले आहे. पुणे दौऱ्यावर असताना पिंपरी-चिंचवड येथे भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. परंतु, यानंतर पोलिसांवर कोणतीही कारवाई करु नये, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती.