shinde fadanvis government : सरकार बनविण्यात जसं देवेंद्र फडणवीस यांचं मोठं कर्तृत्व राहिलं तसंच खातेवाटप करण्यातही देवेंद्र फडणवीसांचा वरचष्मा दिसून येत आहे. कारण आज जाहीर झालेल्या शिंदे सरकारच्या खातेवाटपावर नजर मारल्यास देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक लक्षात येत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवेसेनेला मुख्यमंत्री देऊन राष्ट्रवादीने महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली. तोच पॅटर्न आता देवेंद्र फडणवीस यांनी वापरला आहे. यामध्येही अधोरेखित करण्याची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीच्या चार बड्या नेत्यांची महत्त्वाची खाती त्यांनी आपल्याकडेच ठेवली आहेत. (eknath shinde government cabinet minister portfolio devendra fadanvis)
पण या खातेवाटपामुळे शिंदे गटातील 5 मंत्री नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे दादा भुसे यांचा मोबाईल स्विच ऑफ येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधान आले आहे. तसेच गुलाबराव पाटील, संजय राठोड, दिपक केसरकर आणि संदिपान भुमरे हे पाच मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यावर नाराज असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्यामुळे संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी आधीच आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील घडामोडी ह्या रंजक असणार आहेत.
खातेवाटपावर नजर फिरविल्यास भाजप मोठा भाऊ असल्याचं दिसून येतंय. राधाकृष्ण विखे पाटलांना महसूल खातं देण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटलांना उच्च आणि तंत्रशिक्षण, गिरीश महाजनांना ग्राम विकास, वैद्यकीय शिक्षण अशी खाती देण्यात आली आहेत. सुधीर मुनगंटीवारांना वनं, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय विभाग देण्यात आलेला आहे.