औरंगाबाद : औरंगाबादचा पाणीप्रश्न पेटला असून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजप जलआक्रोश मोर्चा निघाला. यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. ८० वर्षाच्या आजीचा आक्रोश तुम्हाला कधी समजणार, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजची लढाई व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे. संभाजीनगरमध्ये सातत्याने शिवसेनेच्या नेतृत्वात जी भ्रष्टाचाराची व्यवस्था उभी राहीली आहे. या व्यवस्थेला संपविण्याकरीता आज हा मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा भारतीय जनता पक्षाचा नसून जनतेचा मोर्चा आहे. जनतेच्या आक्रोशाला संघटीत करण्याचे काम हे भारतीय जनता पक्षाने केले आहे, असे त्यांनी सांगितले.
या मोर्चात एका ८० वर्षीय आजीने सहभाग घेतला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, आज एका ८० वर्षाच्या आजीने आमच्या मोर्चात भाग घेतला. झुकेगा नही आंदोलन करणाऱ्या आजीच्या मुख्यमंत्री घरी जातात. आता या हंडा घेऊन आंदोलन करणाऱ्या आजीच्या घरात मुख्यमंत्री कधी जाणार, असा सवाल त्यांनी उध्दव ठाकरेंना विचारला आहे. तिचा आक्रोश तुम्हाला कधी समजणार आहे. पण, हा आक्रोश सरकारच्या लक्षात येणार नाही. कारण खऱ्या अर्थाने पाण्याचा सत्यानाश त्यांनीच केला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, भोंगा वादातून भाजप नेते रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षावर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केली होती. यावेळी राणा दाम्पत्याला अडवण्यासाठी शिवसेने कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर वर्षा बंगलाबाहेर जमले होते. यामध्ये एका आजीही सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी 'झुकेगा नही साला' हा पुष्पा चित्रपटातील प्रसिध्द डायलॉग बोलल्या होत्या. यामुळे त्या आजी सोशल मीडियावर चर्चेत होत्या. यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनीही त्यांची भेट घेतली होती.