मुंबई : अमरावतीत टेक्सटाईल पार्क उभारणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे 10 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. तर, तीन लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ते बोलत होते.
अमरावती येथे टेक्सटाईल पार्कचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला होता. त्याचा पााठपुरावा आम्ही करत होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी स्वतः पंतप्रधानांना यासंदर्भात विनंती केली होती. यामुळे आज अमरावतीत टेक्सटाईल पार्क मंजूर झाले आहे. मागील काळात आपण अमरावतीत टेक्सटाईल पार्कची इकोसिस्टीम आधीच तयार केली होती. येथे मोठा टेक्सटाईल झोनही तयार केला आहे. यामध्ये मोठ्या इंडस्ट्रीस तिथे आल्या आहेत. पण, आता याठिकाणी टेक्सटाईल पार्कमुळे 10 हजार कोटींची गुंतवणूक होईल व एक लाख लोकांना थेट व दोन लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात त्याठिकाणी समृध्दी येईल.
तसेच, हा संपूर्ण कापूस उत्पादकांचा पट्टा आहे. येथे टेक्सटाईल पार्क आल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा मिळेल. यामुळे कापूस शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बदलण्यास मदत होईल. यासाठी मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.
दरम्यान, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पा पाठोपाठ राज्यातून चार मोठे प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान महाराष्ट्रासाठी मोठा प्रकल्प देणार असल्याचे सांगितले होते. तर, दावोसमधून गुंतवणूक आणल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. परंतु, ही निव्वळ धुळफेक असल्याची टीका विरोधकांनी शिंदे-फडणवीसांवर केली होती.