मुंबई
भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. तब्बल दीड तास झालेल्या या भेटीत राज्यातील सत्तातरानंतर निर्माण झालेली परिस्थिती, मनसेच्या नवीन सरकारमधील सहभाग, आगामी मनपा निवडणुका यासह आदी विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात 30 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. नव्या सरकारला राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्याआधी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला होता. मशिदीवरील भोंगे न निघाल्यास हनुमान चालीसाचे वाचन करण्याचा आदेश त्यांनी मनसे सैनिकांना दिले.
आता शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेला देखील वाटा मिळेल अशी चर्चा सुरू झाली होती. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद दिले जाणार असल्याच्या बातम्या आहेत. अशाच आजच्या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यावर अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी देवेंद्र फडणवीस दाखल होताच राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी औक्षण करुन त्यांचे स्वागत केले. यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित होते. ही सदिच्छा भेट असल्याचे त्यानंतर सांगण्यात आले तरी दीड तासाच्या या बैठकीत सत्तांतरनंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी निवडणुकांवर चर्चा झाली.
मनपा निवडणुका उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार एकत्र लढवणार आहे. यामुळे या निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वाची ठरणार आहे. या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी राज्यात मनसेसाठी अनुकूल वातावरण असल्याचे वक्तव्य केले. यामुळेच बैठकीत काय झाले आहे, याची चर्चा सुरु आहे.