राज्यात एकीकडे जोरदार गोंधळ सुरु असताना, काल शिंदे- फडणवीस सरकारकडून पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. परंतु, या पालक मंत्र्यांच्या यादीत भाजपचं पारडं जड असल्याचे दिसत आहे. राज्यतील सर्वाधिक जिल्ह्यांचा कारभार भाजपच्या गोटाकडे आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकत्व देण्यात आलं आहे. यावरूनच विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यावरच अजित पवार यांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली होती. आता पवारांच्या याच टीकेवर फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
मी त्यांना गुरुमंत्र देईल
माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, नियोजन मंत्री म्हणून माझ्याकडे सगळे जिल्हे आहेत. मी अख्खा महाराष्ट्र सांभाळला आहे, मग ६ जिल्ह्यांचे काय घेऊन बसलात. मी त्यांना गुरुमंत्र देईल की जर येत्या काळात त्यांचं राज्य आलं आणि त्यांना जर दोन-चार जिल्हे स्वत:कडे ठेवायचे असेल तर ते कसं मॅनेज करायचं याचा गुरु मंत्र देईल. असा जोरदार टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
बारामतीत बारामती सहकारी बँकेच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत असताना अजित पवार म्हणाले होते की, शनिवारी शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची घोषणा केली. काही जिल्ह्यांमध्ये एकच पालकमंत्री दिले आहेत. तर काही पालकमंत्र्यांकडे दोन जिल्हे दिले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्हे देण्यात आले आहेत. माझ्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद होते, तर माझ्या नाकी नऊ येत होते. आठवड्यातून किमान एक दिवस मला जिल्ह्यासाठी द्यावाच लागत होता. त्यामुळे ज्यांच्याकडे सहा-सहा जिल्हे दिले आहेत, ते त्यांना कसं पेलवणार आहे, हे मला माहीत नाही, परंतु त्यांना माझ्या शुभेच्छा, अशी टीका अजित पवार यांनी बोलताना फडणवीसांवर केली होती.