मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पुण्यात सभा घेऊन अनेक मुद्द्यांवरुन विरोधकांवर निशाणा साधला. तसेच, आपण अयोध्या दौरा का रद्द केला, याचेही कारण सांगितले. अयोध्या दौरा झाला असता तर अनेक कार्यकर्त्यांना जेलमध्ये सडवले असते. हा संपूर्ण एक ट्रॅप असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय, भोंग्यासंबंधी लवकरच पत्रके वाटणार असल्याचे ठाकरेंनी सांगितले. यावर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी राज ठाकरेवर टीकास्त्र सोडले आहे.
दीपाली सय्यद म्हणाल्या की, पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आंदोलन करून जेलमध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपून बसणार. हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, अशी टीका त्यांनी ट्विटरद्वारे केला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशमधून मला माहिती मिळत होती. त्यानंतर लक्षात आलं संपूर्ण हा सापळा आहे. या सर्व गोष्टींची सुरुवात ही महाराष्ट्रातून झाली. हा विषय पुन्हा बाहेर काढा असं सांगितलं गेलं. ज्यांना माझी अयोध्या वारी खुपत होती, त्यांनी हा डाव आखला. अयोध्येला जाण्याचा मी हट्ट धरला असता, अन् तिथे जर काही झालं असतं, तर तुम्हाला तुरुंगात टाकले असते. मात्र, मला आपली पोरं वाया घालवायची नव्हती, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच, लाऊड स्पीकरचं आंदोलन एका दिवसासाठी नाही, ते तुम्हाला चेक करत आहेत. हळू हळू ते आवाज वाढवतील. त्यामुळे आता एकदा मुद्दा काढलाच आहे तर तुकडा पाडून टाका असं राज ठाकरे म्हणाले. हे आंदोलन आहे, येणाऱ्या काही दिवसात काही मी पत्रकं वाटणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, 1 जून रोजी राज ठाकरे यांच्या पायाच्या त्रासासंदर्भात हीप बोनवर शस्त्रक्रिया होणार आहे.