मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मागील काही काळापासून नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अजित पवार शिंदे गटात आले तर आम्हाला आनंद होईल, असे म्हंटले आहेत. याला आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महेश तपासे म्हणाले की, अजित पवार हे राज्याच्या 'राजकारणातील सिंह' आहेत. त्यामुळे त्यांना लांडग्या-कोल्हयांच्या टोळीत समावेश होण्याची आवश्यकता नाही. अजित पवार हे नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. मात्र 'वक्त भी हमारा होगा और पार्टी भी राष्ट्रवादी होगी', असेही त्यांनी शिंदे गटाला सुनावले आहे.
काय म्हणाले होते दिपक केसरकर?
भाजप आमदार प्रविण पोटे यांनी एका कार्यक्रमात अजित पवार यांनी सकाळच्याऐवजी दुपारी शपथविधी केला असता तर ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते, असे विधान केले होते. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता दीपक केसरकर यांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन एकमेकांची मैत्री असते. अजित पवार आमच्या सर्वांना त्यांच्याबद्दल आदर आहे. ते आणि आम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोलत असतो. राष्ट्रवादीत त्यांची घुसमट होते. त्यांच्यासारखा उमदा नेता आमच्याकडे आला तर आम्हाला आनंदच होईल, असे त्यांनी म्हंटले आहे.