नाशिक : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रामनवमीनिमित्त आज नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना केसरकरांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ज्यांनी हिंदुत्व सोडले आहे त्यांच्यासोबत राम राहू शकत नाही. आपण हिंदुत्वापासून लांब गेलो हे त्यांनी स्वतः पंतप्रधान मोदी यांच्यासमोर कबूल केलेला आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
काही झालं की भाजपला कठड्यात उभे करायचं. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना एकदा साधं नाव बदलायचा विषय काढला नाही. ज्या वेळेला सत्ता गेली त्या वेळेला कॅबिनेटची बैठक बोलून तुम्ही संभाजीनगर नाव देता. त्यातही दहा कॅबिनेटचे मंत्री गैरहजर असतात, असा निशाणा केसरकरांनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे. बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्व सोडलं आणि हे मालेगावच्या सभेने दाखवून दिलं आहे. काँग्रेसच्या मतांसाठी किती लाचार झालेत, असे त्यांनी म्हंटले आहे.
धनुष्यबाण चोरला असला, तरी प्रभूराम माझ्यासोबत आहेत, असा टोला उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला होता. याला दीपक केसरकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांनी हिंदुत्व सोडले राम त्यांच्याबरोबर राहू शकत नाही. खरंतर हिंदुत्वाचे प्रतीक राम आहे. आपण हिंदुत्वापासून लांब गेलो हे त्यांनी स्वतः पंतप्रधान मोदी यांच्यासमोर कबूल केलेला आहे. आणि महाराष्ट्रात पुनर्प्रस्थापित युती करू असं आश्वासन देऊन दिल्लीवरून पुन्हा मुंबईत आले. मात्र, त्यांनी आश्वासन पाळला नाही. बाळासाहेबांचे नाव आम्हाला दोष देण्यापुरता वापरत आहेत, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकार कुठल्याही परिस्थितीत जातीय दंगली घडू देणार नाही. मला असं वाटतं सरकार याबाबतीत कठोर पावले घेईल आणि कुठल्याही परिस्थितीत जातीय दंगली घडू देणार नाही. सीसीटीव्ही समोर आले असून पोलीस तपासून त्याच्यावरती दोषींवर कारवाई करतील, असे दीपक केसरकरांनी सांगितले आहे.