राजकारण

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यभरात सध्या परतीच्या पावसाने हैदोस घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यभरात सध्या परतीच्या पावसाने हैदोस घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले आहे. यात ओला दुष्काळ जाहीर करुन उपाययोजना करण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, यावर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. ह्या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलंच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने 'ओला दुष्काळ' जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सरकारने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. पण, पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनाम्याचे आदेश देतं. पण, प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन 'ओला दुष्काळ' जाहीर करावा. तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा.

दिवाळी हा आनंदाचा सण, म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकटकाळानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल ह्याकडे राज्य सरकारनं कटाक्षानं लक्ष द्यावं, अशी विनंतीही राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती