राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उफळला आहे. काल मंगळवारी वाद तीव्र झाला होता. कर्नाटकातील हिरे बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. मात्र, आज झालेल्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात देखील या वादावरून गदारोळ उडाला. सोबतच संसदेच्या आवारात देखील खासदारांनी घोषणाबाजी केल्याचे दिसून आले.
लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला. कर्नाटक सरकारवर टीका केल्यानंतर लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली. मात्र या गोंधळा आधी लोकसभा आवाराच्या बाहेर देखील महाराष्ट्रातील खासदारांची घोषणाबाजी सुरु होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संसद भवनाच्या परिसरातील पुतळ्यासमोर उभे राहून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या खासदारांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. बीदर,भालकी,बेळगाव,कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणाही दिल्या. यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राजन विचारे,विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे, डॉ अमोल कोल्हे उपस्थित होते.