मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. कोणतीही एजन्सी पुरावे असल्यावरच कारवाई करते, असे त्यांनी म्हंटले असून याबाबत अधिक बोलणे टाळले.
संजय राऊत यांच्यावरील कारवाईबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणतीही एजन्सी पुरावे असतानाच कारवाई करते. एजन्सीने केलेली कारवाई योग्य की अयोग्य हे कोर्ट ठरवेल. मला याबद्दल अधिक बोलायचे नाही, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी आज संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावर देवेंद्र फडणवीसांनी बोलणे टाळले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज देवेंद्र फडणवीसांची बैठक झाली. याबद्दल बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारच्या योजनांची स्थितीवर आजची बैठक झाली. योजनांची प्रगती व अडचणी याबाबत चर्चा झाली. केंद्र सरकारच्या काही योजना मागे पडल्या आहेत. यात पंतप्रधान आवास योजनेचा समावेश होतो. ग्रामीण भागात आवास योजनेद्वारा 76 टक्के तर शहरी भागात 12 टक्के घरे झाली आहेत. यामुळे शहरी भागात आवास योजनेला कशी चालना देता येईल यासंदर्भात चर्चा झाली, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.