राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली असताना काल राज्यात राजकारणातून मोठी बातमीसमोर आली. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची काल युती झाली. या युतीवर आता राजकीय मंडळींकडून टीका करण्यास सुरुवात झाली आहे. त्यावरच आता एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर जोरदार टीका केली आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी विरोध करणाऱ्या शिवसेनेसोबत आज प्रकाश आंबेडकरांनी युती केली अशी टीका त्यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युतीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीचे राजकारणात फारसे परिणाम होतील असे मला वाटत नाही. कारण ही आघाडी फक्त भाजपला विरोध करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेना यांच्यातील विचाराचा अंतर आपल्याला माहित आहे. ज्यावेळी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यायचं होते त्यावेळी त्याला भाजपने पाठिंबा दिला होता. मात्र, याचवेळी शिवसेनेने नामविस्ताराला विरोध केला होता. असे फडणवीस यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर सतत अकोल्यातून निवडणूक लढले मात्र ते काही जिंकून येऊ शकले नाहीत. त्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल की, शिवसेना आपल्यासोबत आल्यावर हिंदुत्ववादी मते आपल्यासोबत येतील. पण त्यांना माहित नाही की, हिंदुत्ववादी मतदारांनी शिवसेनेची साथ आधीच सोडलेली आहे. कारण शिवसनेने हिंदुत्व सोडले असल्याने हिंदुत्ववादी मते त्यांच्यासोबत राहणार कशी? असा प्रश्न देखील फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.