राज्यात राजकारणात मागील काही दिवसांपासून प्रचंड गदारोळ सुरू आहे. विविध विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली असताना त्यातच दुसरीकडे संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यामुळे चांगलच वातावरण तापले आहे. भिडेंच्या या विधानानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भिडेंच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलने आणि निदर्शने करण्यात येत आहे. दरम्यान भिडेंच्या याच विधानावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले फडणवीस?
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भिडेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'भिडे यांनी जे वक्तव्य केलं त्या विधानाचा पूर्णपणे मी निषेध करतो. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा महानायकाबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं पूर्णपणे अनुचित आहे. माझे स्पष्ट मत आहे की, अशा प्रकारचे वक्तव्य भिडे गुरुजींसह इतर कुणीही करू नये. कारण अशा वक्तव्यांमुळे करोडो लोकांच्या मनात निश्चितपणे संताप निर्माण होतो. लोक महात्मा गांधींविरुद्ध बोललेलं कधीही सहन करणार नाही. या संदर्भात राज्य सरकारकडून उचित कारवाई केली जाईल.' असा थेट इशारा त्यांनी यावेळी भिडेंना दिला.
पुढे ते म्हणाले की, 'महात्मा गांधी असो वा स्वातंत्र्यवीर सावरकर असो, कुणाच्याही विरुद्ध बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. संभाजी भिडेंचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ते स्वत:ची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचं काहीही कारण नाही. भिडेंनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरतायत. पण राहुल गांधी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अतिशय गलिच्छ बोलतात, त्याचाही त्यांनी निषेध केला पाहिजे. पण त्यावेळी ते मिंधे होतात. म्हणून कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही,' असे देखील ते यावेळी म्हणाले.