नुकताच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. राज्यपालांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ सुरु झाला होता. राज्यपालांच्या विधानाचा सर्वच स्तरावरून जोरदार निषेध व्यक्त केला जात होता. मात्र, हा निषेध सुरु असताना आता मुंबईत एका कार्यक्रममध्ये बोलत असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल गौरवोद्गार काढत निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
नेमकं काय म्हणाले कोश्यारी?
एका कार्यक्रमामध्ये बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव करत, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या प्रयत्नामुळे भारत जगात स्वाभिमानाने उभा आहे. भारताची संस्कृती आजरामर आहे. भारतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या माणसांनी देशाला समृद्ध केले आहे, असेही कोश्यारी यांनी नमूद केले.
राज्यपाल दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर?
वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पहिल्यांदा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे. भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यपाल येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे उत्तर भारतात नियोजित कार्यक्रम आहेत. त्यामुळे ते दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.